तिरोडा – तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथे कार्यरत असलेले कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय सध्या वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. अधिकारी व कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याने बहुतांश वेळा कार्यालय बंद आढळून येत आहे. त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार पायपीट करावी लागत असून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
मुंडीकोटा परिसरातील अनेक गावांचा समावेश या मंडळ कृषी कार्यालयाअंतर्गत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वाचे असले तरी प्रत्यक्षात ते केवळ नाममात्र ठरत आहे. विशेष म्हणजे मुंडीकोटा येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. सोमवार हा कार्यालयाचा पहिला कामकाजाचा दिवस असतानाही अनेक वेळा या दिवशीही कार्यालय बंद असते. त्यामुळे कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांना आल्या पावली परत जावे लागते.
परिसरातील शेतकरी पीक विमा, अनुदान, नोंदणी, विविध योजनांबाबतच्या कामांसाठी या कार्यालयात येतात. मात्र अधिकारी व कृषी सहायक अनुपस्थित असल्याने त्यांची कामे रखडत आहेत. दूरवरून येऊनही काम न झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या कार्यालयात एक मंडळ कृषी अधिकारी, दोन पर्यवेक्षक व दहा कृषी सहायक अशी पदे मंजूर आहेत. मात्र एवढा कर्मचारीवर्ग असतानाही कार्यालय नियमित सुरू राहत नसल्याने कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शासनाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. मात्र येथील कर्मचारी मुख्यालयी न राहता बाहेरगावावरून ये-जा करीत असल्याचे सांगितले जात आहे. याचा थेट परिणाम कार्यालयीन कामकाजावर होत आहे.
या प्रकाराची कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी व कार्यालय नियमित सुरू ठेवण्यासाठी योग्य कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.







