अखेरचे अद्यतनित:
Marathi TV actress : अभिनेत्री स्वरदा ठिगळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या शूटिंगनंतर अपघातात सापडली. या घटनेसाठी तिने मालिकेच्या शूटिंगला जबाबदार धरलं आहे.

मुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ मधील ‘मुक्ता’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वरदा ठिगळे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होत असलं तरी, नुकतीच तिच्यासोबत एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसलाय. या घटनेमुळे स्वरदाला ‘वटपौर्णिमेचा महासंगम’ शूट करणं चांगलंच महागात पडलं आहे, असं तिने स्वतःच सांगितलं आहे. पण नेमकं काय घडलं तिच्यासोबत?
पहाटे ५ वाजता ‘पॅकअप’, गाडी चालवताना अपघात!
स्वरदाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या कारला झालेल्या अपघाताबद्दल सांगताना दिसतेय. “आता सकाळचे ६ वाजलेत. पहाटे साडेपाच वाजता माझ्याबरोबर किस्सा घडला आहे,” असं ती व्हिडिओमध्ये सांगतेय. पुढे ती आपल्या गाडीचं फुटलेलं हेडलाइट , खराब झालेलं चाक आणि न उघडणारा दरवाजा दाखवते.
या अपघातामागचं कारण सांगताना स्वरदा म्हणाली, “मी स्टार प्रवाहच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करते. रविवारी, १ जून, २०२५ च्या सकाळी ७ वाजता आम्ही शूटिंगला सुरुवात केली होती आणि सोमवारी, २ जून, २०२५ च्या पहाटे ५ वाजता माझं पॅकअप झालं आहे. चांदिवली स्टुडिओवरून मी एकटीच गाडी चालवत मढपर्यंत आले आहे. मला झोप लागली. मी पेंगत होते. कारण मी प्रचंड थकले होते. सकाळी ७ वाजल्यापासून आम्ही जे शूट करत होतो, ते सकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होतं.”
‘जीव वाचला, हेच महत्त्वाचं!’
या अपघातामुळे स्वरदाचं मोठं नुकसान झालं आहे. “माझं हे मोठं नुकसान झालेलं आहे. हा महासंगम शूट करणं मला फार महागात पडलं आहे. आता मला कितीचा फटका बसणार आहे, याची मला कल्पना नाही; पण मी कृतज्ञ आहे की, माझ्या जीवावर बेतलं नाही. मोठा अपघात झाला नाही, यासाठी मला बरं वाटत आहे,” असं म्हणत तिने देवाचे आभार मानले.
या व्हिडिओच्या माध्यमातून स्वरदाने आपल्या सहकलाकारांना एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे. तिने आवाहन केलं आहे की, “माझी सहकलाकारांना विनंती आहे की, तुम्ही असं करू नका. मला कळलं आहे की, भविष्यात मला काय करायचं नाही. तुम्ही यातून काहीतरी शिका. तुम्ही तुमच्या जीवाशी खेळू नका. काम होत राहील; पण तुमचा जीव महत्त्वाचा आहे, हे एवढंच मला सांगायचं आहे.” या घटनेतून तिने स्वतःही धडा घेतल्याचं आणि यापुढे अधिक काळजी घेण्याचं ठरवल्याचं सांगितलं.
दरम्यान, वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्व मालिकांमधील नायिका एकत्र आल्याचं ‘महासंगम’ विशेष भागात पाहायला मिळणार आहे. या महासंगमात नेमकं काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण या एपिसोडच्या शूटिंगसाठी स्वरदाला मोठा मनस्ताप आणि नुकसान सहन करावं लागलं, हे मात्र नक्की.
मुंबई, महाराष्ट्र
जून 02, 2025 5:18 दुपारी आहे
Swarda Thigale : ‘महासंगम’ शूट करणं महागात पडलं, ‘प्रेमाची गोष्ट’ फेम स्वरदा ठिगळेच्या गाडीचा भीषण अपघात!







