तिरोडा – तालुक्यातील अनेक गावांतील तलाठी नेमणूक असलेल्या गावात राहत नसून तालुकास्तरावरून कारभार हाकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे स्थानिक (नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत असते.
शासनाने ग्रामीण भागातील जनता, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यसासाठी लाखो रुपये खर्च करून तलाठी साझे सुरू केले. सोयी-सुविधायुक्त कार्यालये बांधण्यात आली. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कार्यालये आहेत. मात्र, तलाठी कार्यालयात बसून कारभार पाहत नसल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना शेतीच्या व इतर विविध कामांसाठी तलाठी कार्यालयातून सात-बारा, खाते उतारा अशा विविध दाखल्यांची गरज असते. तसेच शालेय विद्यार्थ्यांसह
नोकरदारांना विविध पदाच्या भरतीसाठी जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र कुटुंब प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी सकाळपासूनच संबंधित शेतकरी, गावकरी व विद्यार्थी तलाठी कार्यालयात पोहोचतात.
परंतु, अनेक तलाठी मुख्यालयाऐवजी तालुक्याच्या ठिकाणी राहून कारभार चालवीत असल्याने पायपीट करावी लागते. त्यातच मुख्यालयी तलाठी मिळाल्यास आज या, उद्या या ही कारणे दिले जात असल्याने जनतेला आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी खासगी कर्मचारी किंवा कोतवालच तलाठ्याची कामे करताना दिसतात. या प्रकारामुळे ग्रामीण नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन तलाठ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी होत आहे..








