तिरोडा – : पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा – एक पेड माँ के नाम’ या अभियानाअंतर्गत चांदोरी खुर्द ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.या वृक्षारोपण सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्य चतुरभूज बिसेन, पंचायत समिती सदस्य डॉ. चेतलाल भगत, खंड विकास अधिकारी अरुण गिरीपुंजे, विस्तार अधिकारी मनोज बडोले, कृषी तांत्रिक अधिकारी लिल्हारे, तूरकर यांच्यासह स्थानिक जनप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता अंबुले, उपसरपंच राधेलाल बिसेन, तसेच शाहील मालधारी, तिर्तन अंबुले आणि गावातील अनेक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.उपक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी झाडांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, वृक्षवल्ली हीच आपली खरी संपत्ती असून प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे ही आजची गरज आहे. बदलत्या हवामानामुळे होणारे परिणाम लक्षात घेता अशा अभियानांमुळे हरित क्षेत्र वाढीस लागेल, तसेच गावाचा पर्यावरणीय समतोल राखण्यात मदत होईल.








