Home » संपादकीय » संपादकिय » ६३ व्या वर्षी नव्या करिअरची सुरुवात – विजय बेदरकर यांची वकिलीच्या परीक्षेत यशस्वी घौडदौड वयाच्या सीमांना छेद देणारा प्रेरणादायी प्रवास

६३ व्या वर्षी नव्या करिअरची सुरुवात – विजय बेदरकर यांची वकिलीच्या परीक्षेत यशस्वी घौडदौड वयाच्या सीमांना छेद देणारा प्रेरणादायी प्रवास

Share:

तिरोडा, जि. गोंदिया
“शिक्षण हे वयाचे बंधन मानत नाही, फक्त लागते ती आत्मिक इच्छाशक्ती आणि ध्येय गाठण्याची जिद्द.”
या उक्तीला खरीखुरी झळाळी मिळवून दिली आहे तिरोडा येथील साई कॉलनीतील रहिवासी आणि माजी न्यायालयीन अधीक्षक विजय बेदरकर यांनी. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी विधी पदवी अर्थात एलएल.बी. परीक्षेत यश मिळवत नव्या उमेदीने आपल्या आयुष्याला वकिलीच्या रूपाने नवी दिशा दिली आहे.विजय बेदरकर यांचे जीवन म्हणजे चिकाटी, संघर्ष, समर्पण आणि ध्येयवेडेपणाचा मिलाफ आहे. ३१ जानेवारी २०२१ रोजी ते गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयातून कार्यालयीन अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. जवळपास चार दशकांहून अधिक काळ त्यांनी न्यायालयीन सेवा बजावली. या कार्यकाळात त्यांनी अनेक वकिलांची कामाची पद्धत, न्यायालयातील प्रक्रिया, युक्तिवाद यांचे बारकाईने निरीक्षण केले. याच दरम्यान त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा जन्मास आली – “स्वतः वकील होण्याची.”पण नियतीने वेगळेच नियोजन केले होते. सेवाकालात कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरीची व्यस्तता आणि कर्तव्ये पार पाडताना त्यांनी आपले स्वप्न मनाच्या एका कोपऱ्यात दडपून ठेवले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या स्वप्नाकडे पाऊल उचलले असतानाच, त्यांना मोठा मानसिक आघात सहन करावा लागला – त्यांच्या पत्नीचे दुःखद निधन. या घटनेने त्यांना मानसिकरीत्या पूर्णतः खचवून टाकले. पण पत्नीच्या आठवणींच्या आधारावर आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी मोठं साध्य करावं या भावनेने त्यांनी एलएल.बी.ची तयारी सुरू केली.साठीनंतर अनेकजण विश्रांतीच्या दिवसांचा आनंद घेतात, पण विजय बेदरकर यांनी मात्र पुस्तकं हातात घेत अभ्यासाला सुरुवात केली. दिवसाचे तास,वाचनालयातील अभ्यास, नोट्स तयार करणे आणि वयाचा अडथळा झुगारून सतत प्रयत्न करत राहणे – हे त्यांनी आपल्या शिस्तबद्ध जीवनशैलीत रुजवले. त्यांचे आत्मविश्वास, तल्लख स्मरणशक्ती आणि संकल्पबळ हे त्यांच्या यशाचे मुख्य आधारस्तंभ ठरले.अखेर २०२५ साली आलेल्या अंतिम वर्षाच्या निकालात त्यांनी यशस्वीपणे एलएल.बी.ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि ‘अॅड. विजय बेदरकर’ म्हणून नवीन ओळख निर्माण केली. हे केवळ एक शैक्षणिक यश नसून, आजच्या पिढीसाठी एक अमूल्य प्रेरणा आहे. जीवनात वयाची मर्यादा नाही, हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले.विजय बेदरकर हे अत्यंत प्रामाणिक, परिश्रमी, अभ्यासू आणि शांत स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी सुरू केलेल्या वकिलीच्या नव्या प्रवासातही ते निश्चितच यशस्वी होतील, असा सर्वांचा विश्वास आहे. समाजात अशा व्यक्तींची नितांत गरज असून, त्यांच्या अनुभवसंपन्न कार्यप्रणालीचा उपयोग कायद्याच्या क्षेत्रातही निश्चितच होईल.

Leave a Comment