Home » शिक्षात्मक » शिक्षण » मारेगाव येथे बिबट्याचा धुमाकूळ : गोठ्यात घुसून ७ शेळ्यांचा फडशा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

मारेगाव येथे बिबट्याचा धुमाकूळ : गोठ्यात घुसून ७ शेळ्यांचा फडशा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Share:

 

तिरोडा – तालुक्यातील मारेगाव येथे सोमवार, दिनांक ७ जुलै २०२५ रोजी रात्री अंदाजे १० ते १२ दरम्यान बिबट्याने शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून ७ शेळ्यांचा फडशा पाडल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून बिबट्याच्या शोधासाठी पेट्रोलिंग पथक नेमण्यात आले आहे.सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथे मागील काही दिवसांपासून बिबट्याचे सतत दर्शन आणि हल्ले होत असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ४ जुलै रोजी धरमदास गोविंदा वंजारी यांच्या एक बकऱ्यावर, ५ जुलैला देवराज रहांगडाले यांच्या गोर्यावर, ६ जुलैला दिलीप ठाकरे यांच्या शेळीवर आणि त्याच दिवशी कवडू बोरीकर यांच्या चार शेळ्यांवर हल्ला करून त्या ठार करण्यात आल्या होत्या. संजय कंगाले यांच्या दोन शेळ्याही यापूर्वीच बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरल्या आहेत.काल सोमवारी रात्री पुन्हा एकदा ही भीषण घटना घडली. रात्री १० ते १२ दरम्यानच्या सुमारास बिबट्याने एका गोठ्यात घुसून ७ शेळ्यांना जागेवरच ठार केले. रात्री शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून संबंधित शेळीपालकाने गोठ्याकडे धाव घेतली असता, त्याला बिबट्या शेळ्यांवर हल्ला करताना दिसला. आरडाओरड केल्यावर बिबट्या पळून गेला, मात्र त्याच्या भीतीने गावकऱ्यांनी रात्रीच एकत्र येत वन विभागाला माहिती दिली.
गावकऱ्यांच्या तक्रारीवरून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तिरोडा वनपरिक्षेत्राचे अधिकारी श्री. भगत यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. त्यांनी सांगितले की, बिबट्याच्या हालचाली लक्षात घेऊन विभागाने एक विशेष पथक पेट्रोलिंगसाठी तैनात केले असून बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात येईल.या सततच्या घटनांमुळे मारेगाव परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे. पाळीव प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामस्थांनी वन विभागाकडे नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

Leave a Comment