तिरोडा – सातोना लाखेगाव मार्गावर विजेचा प्रहार होऊन घडलेल्या भीषण दुर्घटनेत वडेगाव ग्रामपंचायत सदस्य जिवचंद यादोराव बिसेन (वय ४५ वर्षे) यांचा झाडाखाली दबून मृत्यू झाला. त्यांचा मुलगा चिराग जिवचंद बिसेन (वय १६ वर्षे) हा गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर गोंदिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना ता.७ सोमवार रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. जिवचंद बिसेन हे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी मोटारसायकल (ड्रिम युगा एम.एच.३५. ऐ.पी.-९३७०) ने बिरसीकडे निघाले होते. दरम्यान, सातोना लाखेगाव या गावांदरम्यान असलेल्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या करंजीच्या झाड अचानक पडला.झाड क्षणार्धात तुटून खाली कोसळले आणि त्या झाडाखाली जिवचंद बिसेन व त्यांचा मुलगा चिराग हे दुचाकीवरून जात असताना अडकले.झाड थेट अंगावर पडल्यामुळे जिवचंद बिसेन यांचा मृत्यू झाला. मुलगा चिराग याच्या उजव्या हाताला, पायाला, कमरेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेत चिराग याला तिरोड्यातील आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याच्या गंभीर प्रकृतीमुळे अधिक उपचारासाठी गोंदियाला हॉस्पिटलमध्ये तातडीने रेफर केले आहे.जिवचंद बिसेन हे वडेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य होते आणि सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय भूमिका बजावत होते. त्यांनी अनेक विकासकामांमध्ये पुढाकार घेतला होता. त्यांच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांच्या परिवाराला धीर दिला.घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. नैसर्गिक संकटातून झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.स्थानिक नागरिक आणि सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी प्रशासनाकडे पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.








